विवेकज्योत


विचारयज्ञाच्या सर्व वाचकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. दीपावली हा विचारयज्ञाचा जन्मदिन.

विवेकयुक्त तर्करूपी अग्नीमध्ये अज्ञानमूलक विचारांची आहुति देउन ज्ञानामृत प्राप्तिसाठीचा हा विचारयज्ञ सात वर्षांपूर्वी गुरुकृपेने आजच्याच दिवशी दीपोत्सवात सुरू केला.



या यज्ञाने स्तोत्र, कविता व प्रार्थनांचा प्रसाद दिला.

मनातले संशय मिटवले.
आपल्याला अस्वस्थ करणारे प्रश्न आणि त्यांची उत्तरे शोधण्यास मदत केली.

वाढदिवशी आपण उत्तम स्वास्थ्यासह दीर्घ आयुष्याची कामना, प्रार्थना करतो. त्याप्रमाणेच आज विचारयज्ञाच्या स्वस्थ व प्रदीर्घ व्यापक, यशस्वी वाटचालीसाठी सद्गुरुचरणी व ईश्वरचरणी ही प्रार्थना. यात आपण ही माझ्यासमवेत आहात या विचाराने ही एक प्रकारे सामूहिक प्रार्थना आहे.

"हा विचारयज्ञ अव्याहतपणे सुरू राहो. आपल्या विचारांचा वेळोवेळी यज्ञ करावा. त्यात आपल्या वैचारिक, सामाजिक, नैतिक, आत्मिक प्रगतीला बाधक विचारांची आहुती द्यावी आणि प्रगतीला पोषक विवेक रूपी अमृत सतत प्राप्त होत राहावे.

जुन्या चांगल्या परंपरा कालांतराने बदलत्या परिस्थितीत कालबाह्य ठरू शकतात. एखादा विचार अत्यंत नावीन्यपूर्ण, सुंदर आणि उपयुक्त असला तरी तो ही वेगळ्या परिस्थितीत अनुपयुक्त किंवा अविवेकी ठरू शकतो हे मानवी मन व समाजाचे वास्तव आहे. याचे भान सतत जागृत राखणारा हा विचारयज्ञ ठरो.

विचारांचा दुराग्रह इथे नाही. पुढेही नसावा. उजवी विचारसरणी माझी, डावी माझी किंवा माझीच विचारसरणी निर्भेळ माझ्या विरुद्ध मत असणाऱ्यांची हानिकारक पूर्ण चुकीची असे तट इथे नाहीत. जे जे मंगल, पवित्र, आणि व्यापक हितकारी ते विचार विवेकी. जेव्हा जिथे विरोध आवश्यक ठरतो तेव्हा तो तर्क व विवेकानेच. विचारांचा यज्ञ सोडून दुर्भावनेचे अविवेकी द्रव्य या यज्ञात कधीही असू नये. किंबहुना दुर्भावनेचा स्पर्शही या यज्ञास नसावा.

या विचार यज्ञाच्या अमृताने आपले विचार आणि जीवन समृद्ध व्हावे व अधिकाधिक जनांनी यात सहभागी व्हावे.

त्यामुळेच विचारयज्ञ हा केवळ ब्लॉग न राहता आपल्या जीवनाचा, आपल्या मनाचा स्वभाव व धर्म व्हावा. विचारयज्ञ आपली ज्ञानमार्गाची वाटचाल पूर्ण करणारा ठरो."

वाचकांचे स्नेह व लेखनावर दाखवलेला विश्वास लेखनास प्रेरणा ठरते. आपल्या सहभागास नमन. खूप खूप धन्यवाद.