भाजप सरकारच्या शासनाला दोन वर्ष पूर्ण झालीत. त्यानिमित्त सरकारी प्रचाराचा भाग म्हणून, गाणी, जाहिराती आणि विशेष कार्यक्रमांचे आयोजनही होत आहे. देशातला भीषण दुष्काळ आणि महागाई पाहता, हा जल्लोष खरंच आवश्यक आहे का हे मनात आल्यावाचून राहणे शक्य नाही. या विषयावरंच आजची कविता:
फाटक्या कपड्यांनी
उपाशीपोटी नाचायचं
देश जिंकला, अच्छे
दिन आले माझे
बेधुंद नाचायचं
रिकामी भांडी वाजवायला घ्यायची
अच्छे दिनांचा कर्कश सूर लावायचा
अच्छे दिन आले माझे गायचं
बेधुंद नाचायचं
दोन थेंब पाणी
डोळ्याने दिसत नाही,
आता निराश कोरड्या डोळ्यांत आसवं
पण येत नाहीत
‘मन की बात’ ऐकून मात्र
नाचायचं
माझा देश, माझा देश
किती बदललाय
बेभान होऊन नाचायचं
उपाशीपोटी योग
करायचा,
म्हणजे भूक लागणार
नाही.
महागाईची ओरड करायची नाही,
सरकारी वैभव पाहून
तृप्त व्हायचं
जाहिरातीतले 'अच्छे दिन' बघून गायचं
अच्छे दिन आले माझे
बेधुंद नाचायचं
दुष्काळ दुष्ट कितीही
कठोर बनो
पाण्याविना तडफडत
साहेबांची सेल्फी पाहायची
आणि अच्छे दिन मात्र आले माझे म्हणायचं
त्या नाचणाऱ्यांबरोबर
आपणही डोळे मिटून नाचायचं
कायमचे डोळे मिटेपर्यंत नाचायचं
मीही म्हणेन अच्छे
दिन आले कोणाचे तरी
चार पैसे नसले जरी माझ्या दारी
छप्पर नसलं डोक्यावर
जरी
तरीही अच्छे दिन आले गायचं
माझा देश बदललाय
म्हणून बेधुंद नाचायचं
दुःखाची तक्रार करायची नाही
या आनंदाच्या नशेत आपली लाजिरवाणी गरीबी दाखवायची नाही
इतक गायचं, इतक नाचायचं
इतका जल्लोष करायचा की त्यात
सगळ्या आर्त किंकाळ्या कायमच्या विरून जातील
मग म्हणावंच लागेल प्रत्येकाला
अच्छे दिन आले माझे
फक्त बेधुंद नाचायचं
बेभान जल्लोषात आपला आवाज जिवंत ठेवायचा असेल
तर गावंच लागेल प्रत्येकाला
अच्छे दिन आले माझे
ज्याचे अच्छे दिन आले नाहीत त्याने तोंड बंद करावं
नाहीतर त्या देशद्रोह्याने शत्रुराष्ट्रात जावं
आमच्या अच्छे दिनांत स्थान फक्त जल्लोषाला
नसेल जमत तर
गळफास गळ्यात
लटकावून
आवळण्याआधी म्हणायचं
अच्छे दिन खूप जगलो
आता ‘अच्छा मृत्यू’ बघायचा!आता फक्त 'अच्छा मृत्यू' बघायचा!
विचारयज्ञ मध्ये अन्य पोस्ट्स:
- अपेक्षांचे तीन पैलू जे तुमचे जीवन बदलू शकतील
- सोशल मीडिया चे व्यसन साधनेला बाधक
- स्वामी विवेकानंदासी नमन
विचारयज्ञ फेसबुकवर: आजच सामील व्हा