गीत नववर्षाचे

विचारयज्ञाच्या सर्व सदस्यांना जय नामक हिंदू नववर्षाच्या अर्थात गुढीपाडव्याच्या, वासंतिक नवरात्रोत्सवाच्या व श्रीराम नवरात्रोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा! हे नववर्ष आपणां सर्वांना सुख, समृद्धी, भरभराट, शांती आणि आनंदमय ठरो ही श्रीगणेशाच्या चरणी प्रार्थना!


हे विघ्नहर्ता! विश्वांतील उत्तमोत्तम विचारांनी आपला हा यज्ञ असाच संपन्न होत राहो हेच मागणे!
आपले नवीन वर्ष आले, हे सांगण्यासाठी खरे तर सारी सृष्टीच सज्ज होते कारण साक्षात ब्रह्मदेवांनी सृष्टीची रचना ज्या दिवशी केली तो हा दिवस. त्यामुळे सगळी सृष्टी नवचैतन्याने – नवीन रूप घेऊन मुक्तपणे हसत आपल्याला भेटते नवीन वर्षाचे नवीन गीत घेऊन....

नवपालवी सजली, बहरली आनंदाने
नववर्षाच्या स्वागता सृष्टी सज्ज झाली
कोकीळ गान करी नव आगमनाचे
मरुत् संगीत देई, गाण्या गीत वसंताचे
मुक्त रंग, उन्मुक्त हास्य
सौंदर्य फुले निसर्गाचे
नवचैतन्यदायी गीत हे नववर्षाचे
कटू आठवणी गत वर्षाच्या
गळू द्या पिकल्या पानांपरी
मोहरू द्या मनास आम्र मोहरापरी
विसरुनी सारे भेदभाव
गुढी उभारू प्रेमाची
एकतेच्या संकल्पाने
सुरुवात करू या नववर्षाची      
भरभरून आनंदाने आणिक
निश्छल प्रेमाने
भेटू या नववर्षास
राष्ट्रप्रेमाने, विश्वप्रेमाने
हृदयी घेऊ या हर श्वास.
प्रेम, आनंद आणि एकता
हीच शिकवण निसर्गाची
ती जगण्याचा संकल्प करुनी
करू या सुरुवात नववर्षाची
करू या सुरुवात नववर्षाची ... ....

  

हे आनंदाचे - नववर्षाचे गीत असेच गात राहावे असे वाटते न?  

अजून एक गीत असेच ..- नववर्ष हे आनंदाचे  

Comments