श्रीदत्त प्रकटले


अध्यात्माच्या वाटेवर चालायचे ठरवले तर, संसारात ओढण्यासाठी सगळीकडून प्रयत्न केले जातात. कधी कधी वाटते मी चूक तर करत नाही न!
आज श्रीदत्तजयंती श्रीदत्तभगवानच सगळ्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकतात. 

श्रीदत्त भगवान, देवपूर - धुळे (दत्त मंदिर चौक ज्यामुळे प्रसिद्ध आहे, ते मंदिर)


दत्त दत्त दत्त आले
गृहि आज दत्त आले
साक्षात मम समोरी दत्त आले
आज दत्त मला दिसले
शांत निर्विकार चेहरा
प्रकाश तेज सहजी पसरला
ध्यान हे पाहून हृदय
शांत झाले
आज साक्षात दत्त आले
निर्मल डोळे प्रेम पसरले
अनाथ बाळा सनाथ केले
दुःख हृदयीचे शांत झाले
आज समोरी दत्त आले
विराट देह यती श्रीवल्लभ
माता मज ते जणू भासले
आज हृदयी दत्त प्रकटले
हृदयीचे देव समोरी ठाकले
दुःखाने मी रडत होते
विश्वीं मजला कुणीच नाही
जीवन हे असे भयंकर
नाती सर्व तृष्णाच केवळ
यात शांत दत्त प्रकटले
खरे नाते मला उमगले
एकांतवास हा योग्य आहे
संसार कारण खोटा आहे
खोटे नाते बंधुत्वाचे
खोटेच सदा माता - पित्याचे
पतीस माझ्या मीच विसरले
दत्ता दिसता ‘श्रीराम स्मरले
माता पिता खरेच दत्त
बंधू सखा स्वजन आप्त
तेच आज स्पष्ट पाहिले
मला आज दत्त दिसले
खरे खोटे पुसू नका हो
दत्त खरेच जाणुनी घ्या हो
‘अश्रेद्धेने’ मीही भरकटले
दत्त मला मार्गी घेउनी आले
दत्त म्हणजे सद्गुरुच
अनाथांची आईच केवळ
संसारी या भयानक
जो भासे सत्य केवळ
ते तर सारे खोटेच आहे
पण  
'भ्रमाने’ दत्तास खोटे मानिले  
ईश्वर नसे खोटा कधी
खोटे तर हे विश्व आहे
दत्त मजला असे भेटले
म्हणून हृदय आज स्थिर झाले
नको नको तो माया प्रपंच!
जेणे मजला सताविले अनंत!
ईश्वरा विसरून काही न उरले
दत्त भेटता सत्य उमगले
ईश्वरा विसरून काही न उरले
ईश्वरावाचून काही न उरले
दत्त भेटता सत्य स्मरले
श्रीरामावाचुन सत्य न दुसरे



ईश्वराविसरून काही न उरले – ईश्वराला विसरल्यावर खरेच सगळेच संपले, कारण संसार म्हणजे केवळ दुःख!
ईश्वरावाचून काही न उरले – पण ईश्वरास शरण जाता संसाराचेच मूळ नष्ट होते, तर दुःख काय आणि सुख काय, संसारात राहून संसारापलीकडे असे जीवन होते.