प्रार्थितो गणराज तुम्हां..

दरवर्षी आपण गणेशोत्सवात गणपतीस प्रार्थना करतो. आपल्या सर्वांच्या आयुष्यात सुखसमृद्धी व शांती नांदावी यासाठी आपण गणेशास सांगतो.


यावर्षी गणराज स्वतःच त्याच्या भक्तांस, आपल्याला सर्वांना प्रार्थितो आहे,


"माझ्या उत्सवानिमित्त आरंभलेले ध्वनिप्रदूषण आता थांबवा. तुमचे प्रेम व भक्ती पाहून, अतिशय आनंदाने, दरवर्षी मी तुम्हां सर्वांस भेटण्यास आतुर असतो. तुम्ही जशी माझी वाट बघता, तशी मी पण तुमच्या घरी आणि सार्वजनिक मंडळांत यायची वाट बघतो. यावर्षी तुमची लवकर भेट व्हावी असे मला वाटते. पण माझ्या नावे असणारा हा उत्सव सुरु होताच कर्णकर्कश ध्वनिप्रदूषण भक्तीला प्रदूषित करते. मी भक्तांकडून माझा उत्सव साजरा करायला ध्वनिवर्धक असावेच असे कधी म्हणेन का?

माझ्या भल्या मोठ्या कानांत गणेशोत्सवादरम्यान दहा दिवस अक्षरशः आदळणाऱ्या गोंधळात मी कुठेतरी दाबली गेलेली भक्ती शोधतो.

भक्तांच्या हृदयातून उठणाऱ्या प्रार्थना ऐकायला मला ध्वनिवर्धकांची आवश्यकता का भासेल! यावर्षी मी गणेशभक्तांस ध्वनिप्रदूषणातून माझ्या मुक्तीसाठी प्रार्थना करतोय.

तुम्ही स्वेच्छेनेच आपल्या स्वर्गोपम पृथ्वीचा प्रदूषणाने नाश कराल तर मी कुठल्यातरी स्वर्गातून शांती पाठवू शकत नाही.

तुम्हांला कर्णकर्कश गाणी वाजवायला आवडत असतील तर ती माझ्या उत्सवाच्या निमित्ताने लावू नका.
श्रद्धा व भक्तीला आपल्या हातातले खेळणे समजू नका.

माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचेल अशी मी आशा करतो."

English: 

Lord Ganesha Praying...

गणेशोत्सव विशेष पोस्ट्स: