गणेश पुजनाबाबत हे प्रश्न नेहमी विचारले जातात. उजव्या
सोंडेच्या गणपतीचे सोवळे कडक पाळावे लागते किंवा उजव्या सोंडेचा गणपती घरी आणल्यास
समस्या निर्माण होऊ शकतात किंवा अगदी बोली भाषेत म्हणायचे तर घरात वाईट होते...हे
सगळे खरे आहे का?
परमेश्वर निराकार आहे; निर्गुण आहे. निर्गुण आणि निराकाराचे
ध्यान करायचे कसे ? त्यासाठी आपल्यालाही सत्व, रज आणि तमाच्या पलीकडे गेले पाहिजे.
परब्रह्माचे स्वरूप स्वत: ब्रह्म होऊनच जाणता येऊ शकते. मग हे कसे शक्य आहे?
त्यामुळे अध्यात्माच्या प्राथमिक अवस्थेत आपण साकार आणि सगुण ईश्वराचे चिंतन करतो.
आणि त्याचे चिंतन तरी एकाच रूपात का करावे? भाव तसा देव त्याप्रमाणे आपल्या भाव
भावनांशी जुळेल अशा परमेश्वराच्या रूपाची पूजा आपण करतो. त्या पूजेने भक्ती दृढ
होत जाते आणि भक्ती ही अधिकाधिक उन्नत साधना होत जाते. प्रेमाची सर्वोच्च अवस्था
म्हणजे भक्तीयोग. आणि ते प्रेम इतके वेड लावते की नको ते ब्रह्मज्ञान आणि नको
जीवनमुक्ती अशी भक्ताची अवस्था होते. सर्व संतांनी हेच सांगितले आहे.
भक्ती किंवा प्रेम हे आपण परमेश्वराच्या रूप आणि गुणांवर
करतो. अशा रूपाचे मानसिक चिंतन ही कठीणच. सोपा मार्ग म्हणजे ईश्वराची प्रतिमा
किंवा मूर्ती. पुराणांत आपण विविध कथा वाचतो. त्यांमध्ये सर्वोच्च भक्तियोगाचा
संदेश विविध प्रकारची व्रते, उपासना, नामजप आणि पूजा यांच्या माध्यमातून दिलेला
दिसतो. पुराणांतील बहुतांशी कथांमध्ये पार्थिव मूर्ती स्थापनेचा उल्लेख येतो.
म्हणजे पार्थिव मूर्ती स्थापन करायची. (हल्ली आपण याला घरीच इकोफ्रेंडली गणपती
बनविणे म्हणतो.. हे मुळात पुराणांतच आहे.) त्यात देवतेचे आवाहन करायचे. षोडशोपचार
पूजा करायची. आणि विसर्जन करायचे.
सध्या आपण घरी देवाची मूर्ती किंवा प्रतिमा स्थापित करतो.
तिची प्राणप्रतिष्ठा करतो आणि मग रोज देवपूजा, अभिषेक, स्तोत्रे असे असते. मूर्तीत
प्राणप्रतिष्ठा केली म्हणजे आपण त्या निराकार सर्वव्यापी ईश्वरास आपल्या छोट्याशा
मूर्तीत बोलावले आणि आपल्याला ज्या रूपाची आवड आहे, त्यात विराजमान होण्यास
प्रार्थिले.
रोज आपण जी मूर्तीपूजा करतो ती त्या दगडाची किंवा धातूची
ज्यापासून मूर्ती बनलेली आहे त्यांची पूजा नसून, परमेश्वराच्या साकार रूपाची पूजा
असते. आणि निराकार परमेश्वरास साकार होणे काय अशक्य आहे! त्यामुळे आपला देव आपल्या
मूर्तीच्या रूपांत आपली पूजा, भाव सगळे आनंदाने स्वीकार करत असतो.
आता आपला गणपती म्हणजे गजमुख आहे. त्यामुळे मोठमोठे कान आणि
मोठी सोंड हे त्याचे रूप. तो मूर्तीत बसला असला तरी निर्जीव आहे का? तो तर साक्षात
परमेश्वर आहे. मग सोंड कायम एकाच दिशेने ठेवेल का? मूर्ती बनविताना ती सरळ
किंवा डावीकडे किंवा उजवीकडे ठेवणे आवश्यक आहे, त्यामुळे आपण उजव्या सोंडेचा किंवा
डाव्या सोंडेचा गणपती हे तांत्रिकदृष्ट्या म्हणू शकतो पण वास्तवात गणपती असा एकसारखा
एकाच स्थितीत असणार नाही.
त्यामुळे जेव्हा आपण सोंडेवरून शंका उपस्थित करतो त्यावेळी
आपण केवळ मूर्तीबद्दल बोलत असतो, प्रत्यक्ष गणेशाबद्दल नाही. सोंडेच्या दिशेवरून
आपण गणेशाचेही विभाजन करणार का? चांगला गणपती, कडक गणपती, रागावणारा, शिक्षा
देणारा वगैरे असे काही शक्य आहे का?
आध्यात्मिक विचारयज्ञ:
- सोशल मीडियाचे व्यसन साधनेला बाधक
- भगवान परशुराम: अधर्माविरुद्धचा चिरंजीव धर्मयोद्धा
- स्त्रियांनी कार्तिकस्वामी दर्शन घ्यावे की नाही? समज - अपसमज